कर्नाटक: संध्याकाळपर्यंत विधानसभा अध्यक्षांना भेटा, सुप्रीम कोर्टाचे बंडखोर आमदारांना आदेश

संध्याकाळपर्यंत विधानसभा अध्यक्षांना भेटा, सुप्रीम कोर्टाचे बंडखोर आमदारांना आदेश

वृत्तसंस्था:
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेश कुमार यांची भेट घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हे आदेश दिले.

आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर आजच्या आजच निर्णय घेण्याचे आदेशही विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. या संदर्भात अध्यक्षांनी काय निर्णय घेतला, हे शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाला कळविण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राजीनामा स्वीकारण्यास चालढकल करीत आहेत. ते त्यांच्या घटनात्मक पदाचा गैरवापर करीत आहेत, म्हणून बंडखोर आमदारांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. कर्नाटकमधील सर्व बंडखोर आमदार मुंबईतील रेनेसान्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. काल त्यांना भेटण्यासाठी आलेले राज्यातील मंत्री डी के शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलच्या आत जाण्यास मज्जाव केला होता. त्यांना दुपारी ताब्यात घेण्यात आले आणि संध्याकाळी पुन्हा बंगळुरूच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान, हॉटेलमध्ये खोली आरक्षित केलेली असतानाही आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे माझे वकील संबंधित हॉटेलविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शिवकुमार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कर्नाटकातील एच डी कुमारस्वामी यांचे सरकार अडचणीत सापडले आहे. कुमारस्वामी यांच्याकडे विधानसभेत बहुमत राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे राज्यातील नेते बी एस येडियुरप्पा यांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: