कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत अंतिम निकाल आला नसला तरी एकंदरीत कलांमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. कर्नाटकमध्ये असलेल्या मुख्यमंत्री येडुरप्पा यांचे भाजप सरकार या निकालामुळे भक्कम झाले आहे. विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर भाजप आता 12 जागा जिंकणार हे जवळपास चित्र स्पष्ट होत आहे.
कॉंग्रेस आघाडीला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. भाजपने 15 पैकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 2 आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला किमान 7 जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. दरम्यान, काँग्रेस नेता डी के शिवकुमार यांनी अपयश स्वीकारली आहे. जनतेचा जनादेश आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमचं अपयश स्वीकारतो.
दरम्यान, अंतिम निकाल हाती येण्याआधीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी सांगितलं की, मतदारांनी दिलेला कौल मान्य करावा लागेल. लोकांनी पक्ष बदलणाऱ्यांनाच निवडून दिलं आहे. आम्ही पराभव स्वीकारतो पण आम्हाला नाही वाटत की यामुळे आम्ही निराश झालो पाहिजे.
कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यावेळी 66.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, या पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये येल्लापूर, चिकबल्लारपूर, विजयनगरा आणि महालक्ष्मी या मतदारसंघात भाजपाने आघाडी घेतली आहे. तर शिवाजीनगर आणि हुनासुरू या मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. होसकोटे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार एस.के. बचेगौडा आघाडीवर आहेत.
2018 मध्ये कर्नाटक विधानसभान निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते.
दरम्यान,त्यानंतर राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, ज्या आमदारांनी राजीनामे देत एच .डी . कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते.