कर्नाटक । कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात ते स्टेजवर रडतांना दिसत आहे. मांड्या येथे एका सभेला संबोधित करतानाच त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि कुमारस्वामी रडू लागले. या मतदारसंघात आपल्या मुलाचा पराभव झाल्याची बाब अधोरेखित करत, जनतेने त्यांना एकाकी पाडले म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्याने त्यांच्या डोळयात पाणी आहे.
जेडीएसचे उमेदवार बी. एल. राजू यांच्यासाठी प्रचार सभेत त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ५ डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या धर्तीवर ते येथे जेडीएसचे उमेदवार बी.एल.राजू यांच्यासाठी प्रचार करत होते.
या वेळी बोलतांना त्यांनी मला हे राजकारणच नकोसे झाले आहे. मला मुख्यमंत्रीपद नको. मला फक्त तुमचं प्रेम हवं. माझ्या मुलाचा पराभव का झाला हे मला ठाऊक नाही. त्याने मांड्या येथून निवडणूक लढावी असंही मला वाटत नव्हतं. पण, त्याने निवडणूक येथूनच लढावी असं माझ्या इथल्या जवळच्या लोकांना वाटत होतं. त्यांनीच माझ्या मुलाला पाठिंबा दिला नाही. मला याच गोष्टीचं अत्यंत दु:ख होत आहे’, असं म्हणताना कुमारस्वामी यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. निवडणुकीत पराभूत होण्याचं दु:ख नाही पण आपल्या लोकांनीच आपल्याला एकटं पाडल्याचे याचे शैल्य मनात घर करून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.