एमआयएम वंचितमधून बाहेर, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची घोषणा

औरंगाबाद । विधानसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा होऊन तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाला आठ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव अमान्य करीत एमआयएम’ राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाने जाहीर करत एमआयएम वंचितमधून बाहेर पडली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात खासदार ओवेसी यांना बुधवारी ‘एसएमएस’ पाठविला आहे. यामुळे ‘एमआयएम’मध्ये चलबिचल सुरू झाली होती, आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन दिवस वाट पाहण्याचा निर्णय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. समाधानकारक निर्णय न झाल्यास ‘एमआयएम’ राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सूचित केले होता. त्यानुसार एमआयएम वंचितमधून बाहेर पडली आहे. 

गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच एमआयएमने बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. वंचितकडून आठ जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती.मात्र हे गणित दोन्ही बाजूकडून जुळून न आल्याने  अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकांची मते मिळवली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीच्या साथीनेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला दूर केलं होतं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: