अहमदनगर । विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 3 दिवस उरलेले असताना आता उमेदवार थेट मतदारांच्या दारी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. फक्त शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील उमेदवार प्रत्येक छोट्या गावा-गावात जाऊन मतं मागत आहेत. पण अशाच एका गावात मतं मागण्यासाठी गेलेले भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना थेट गावकऱ्यांच्या रोषालाच सामोरं जावं लागलं.
‘गेल्या 10 वर्षापासून तुम्हीच आमदार आहात. मग चारीला पाणी का येत नाही? पाण्याचा प्रश्न कधी सोडविणार?, असे प्रश्न विचारत पालकमंत्री आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांना कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी येथील गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. अचानक गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर राम शिंदें यांनी आयोजित चौकसभेतून काढता पाय घेतला. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जातीय समीकरणे महत्त्वाची
या मतदारसंघात जातीची समीकरणेही महत्त्वाची आहेत. इतर मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. मराठा कार्ड व माधव (माळी, धनगर, वंजारी) ही राजकीय बांधणी निकाल ठरवू शकते. कोटय़वधी रुपयांचा निधी मिळविल्याचा मुद्दा शिंदे मांडत असले तरी विकासकामे नित्कृष्ट प्रतीची झाल्याचा मुद्दा रोहित पवार पुढे करतात.
राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने राष्ट्रवादीने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. राम शिंदे हे मूळच गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे. खातेबदलात पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले.