उद्धव ठाकरे पाठोपाठ आदित्य ठाकरेंना धक्का, या बड्या महिला नेत्याने दिला पदाचा राजीनामा

 

राज्यात सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम सुरु आहे. ठाकरे गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना आता युवासेनेतही मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. विशेषत: पुण्यातील युवासेनेत अंतर्गत वाद उफाळला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेव्हा युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी पझडड कशीबशी थांबवली होती.

मात्र आता पुण्यात शर्मिला येवले यांच्या रुपाने युवासेनेला खिंडार पडले आहे. शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे आरोप त्यांनी केले होते. येवले लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसे घडल्यास येवले यांचा राजीनाम्यानंतर पुण्यातील युवासेनेचे आणखी काही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व महिला पदाधिकारी मुंबईतील शिवसेना भवनात गेल्या होत्या. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी त्यांची समजूत काढली होती. वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. परंतु, आता शर्मिला येवले यांनी राजीनामा दिल्याने युवासेना अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमका काय मार्ग काढणार हे बघावे लागेल.

Team Global News Marathi: