उद्धव ठाकरे म्हणाले..त्यांनी राजकारणात ही कमीत कमी जागांमध्ये सरकार आणून दाखवले…त्यामुळे आता कोणी म्हणू नये की

मांजरी :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याजवळ असलेल्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. तर दुसऱीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मिश्किल टोला लगावला आहे. 

मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यावेळी राज्यात सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आणि ज्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला असे विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. 

भविष्यातील सहकारी

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या व्यासपीठावर मी शरद पवारांचे नाव घेतो. त्याबरोबर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे माझे नवे सहकारी आण इतर मान्यवर ते कदाचित भविष्यात माझे सहकारी होऊ शकतील असे म्हणत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले. त्यानंतर एकच हशा पिकला. 

माझ्या चुकीच्या शब्दांची जबाबदारी पवारांवर 

मी चुकून एखादा शब्द चुकीचा बोललो आणि तुम्हांला जे अपेक्षित आहे ते बोलण्यात आले नाही. त्याला जबाबदार कोण हे देखील आपल्याला सांगून ठेवतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. याला जबाबदार, माझ्या वडिलांचे मित्र आणि ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला, की उद्धव तुला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल, ती व्यक्ती याला जबाबदार आहे. 

महाविकास आघाडी सरकारचे श्रेय पवारांना 

हे सरकार जे आहे, त्याचे नेतृत्त्व आता पवार साहेबांकडे आहे. जसे तुम्हांला ते कमीत कमी जागेत उस उत्पादन द्यायला शिकवतात. तसेच त्यांनी राजकारणातही कमीत कमी जागांमध्ये सरकार आणून दाखवले आहे. त्यामुळे आता कोणी म्हणू नये की जागा जास्त आहेत. आता आमचं पीक येणार. नाही आम्ही कमीत कमी जागांमध्येही तुमच्यावर मात करू शकतो आणि ती करून दाखवली. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: