मुंबई । राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्ष आता संपलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर शपथ घेणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केली आहे. या ग्रँड सोहळ्यास अनेक ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट असले तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोणत्या पक्षाचे किती आमदार शपथ घेणार याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्याची नावे समोर आली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. हे सहा मंत्री आज शपथ घेणार असले तरी कोणाला कोणते खाते मिळणार याबाबतचा तपशील समोर आलेला नाही.