पुणे | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, अशा शब्दांत संजय राऊत संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.
आज पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी शरद पवार यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा गौरव केला. राऊत म्हणाले की, ”शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही.