पवना,इंद्रायणीसह अन्य नद्यांना पूर
पार्थ आराध्ये
पंढरपूर- भीमा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी,पवना, मुळा ,मुठा या नद्यांना पूरसदृश्य स्थिती असून पुणे बंडगार्डनचा विसर्ग 56 हजार क्युसेक होत .तर उजनी धरणात दौंडजवळून मिसळणारे शनिवारी सायंकाळी सहा वाजता 25 हजार क्युसेक इतके झाले होते. ते वाढत 80 हजार ते 1 लाख क्युसेक पर्यंत जाईल असा अंदाज आहे. पावसाचा जोर अनेक प्रकल्पांवर कायम असल्याने व भीमा नदी परिसरात ही पर्जन्यराजा बरसत असल्याने उजनीची आवक आणखी जास्त प्रमाणात वाढू हा प्रकल्प येत्या काही दिवसात वजा पातळीतून उपयुक्त स्थितीत भरण्यास प्रारंभ होईल.
उजनीची स्थिती सध्या वजा 26 टक्के असून रविवारी दौंडजची आवक जेंव्हा लाख क्युसेकच्या आसपास जाईल तेंव्हा हे धरण वेगाने भरून वजा पातळीतून बाहेर येण्यास मदत होईल. शनिवारी सायंकाळी 24 हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत मिसळत होता. सह्याद्रीच्या रांगामध्ये पावसाचा जोर खूप आहे. भीमा नदीचा उगम असणार्या भीमाशंकर परिसरात ही पर्जन्यराजा तुफान बरसत असल्याने उजनीला फायदा होत आहे. मुळा मुठा, इंद्रायणी, पवना व पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मागील चोवीस तासात सर्वच धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यात कलमोडी 150 मिलीमीटर, चासकमान 88, वडीवळे 195, आंध्रा 153, पवना 179, कासारसाई 109, मुळशी 204, टेमघर 170, वरसगाव 145, पानशेत 145, खडकवासला 70 मि.मी. अशी नोंद आहे. याच बरोबर घोड उपखोर्यात ही पावसाचा जोर असून डिंभे प्रकल्पावर 90 मि.मी.पावसाची नोंद झाली असून या धरणातून 3900 क्युसेक पाणी घोडकडे सोडण्यात आले आहे. तेथील अन्य धरणांवर ही पावसाचा जोर कायम आहे.
भीमा खोर्यात ही पावसाचा जोर वाढल्याने उजनीला पाणी देवू शकणारी धरणे आता वेगाने भरू लागली आहेत. कलमोडी व कलमोडी 100 टक्के भरले आहे तर वडीवळे प्रकल्प 93 टक्के झाला आहे. मुळशीची वाटचाल टक्केवारीच्या साठीकडे आहे. तर पवना 56 टक्के आहे. भीमेवर चासकमान 71 टक्के भरले आहे. मुळा मुठा उपखोर्यातील साखळी धरण परिसरात जोरदार पर्जन्य बरसत असल्याने तेथील प्रकल्प ही झपाट्याने वधारत आहेत. दरम्यान वडीवळे, कलमोडी, आंध्रा व कासारसाई या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले असून या चार धरणांमधून 23 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. मुळा मुठा उपखोर्यातील पावसाचा जोर पाहता साखळी धरणे झपाट्याने भरत आहेत. यामुळे खडकवासला प्रकल्पातून ही पाणी सोडले जाण्याची शक्यता जास्त आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा