मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत ते 27 सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहणार असल्याचे सांगितले.
आज ते ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहणार आहेत. यानंतर आता ईडीचे पत्र आले आहे. तुर्तास शरद पवारांच्या चौकशीची गरज नसल्याचे या पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच भविष्यातही कदाचित शरद पवारांच्या चौकशीची गरज भासणार नाही. असेही ईडीने या पत्रातून स्पष्ट केले आहे.
शरद पवारांनी ईडीला दिलेल्या पत्राला हे उत्तर मिळाले आहे. यामुळे आता शरद पवार हे दोन वाजता ईडी कार्यालयात जाणार की माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
तत्पूर्वी शरद पवार हे स्वतः ईडी कार्यालयात हजर राहणार असल्यामुळे काल संध्याकाळी कुणालाही स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची परवानगी नसल्याची भूमिका ईडीने घेतली होती. दुसरीकडे शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी गर्दी न करण्याचे आवाहन करुनही मुंबईत गर्दी केली.
परिणामी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच ईडी कार्यालय परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शरद पवारांच्या पॉवरगेममुळे ईडीला बॅकफूटवर यावं लागल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.