आ. तानाजी सावंत यांच्याबाबत शिवसेनेची सावध भूमिका

पार्थ आराध्ये

पंढरपूर-  मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी ऐवजी आपली ताकद भाजपाच्या पाठीशी लावली तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर असताना ही त्यांच्या बैठकांना दांडी मारल्याने पक्षश्रेष्ठी चांगलेच वैतागले आहेत.

सावंत यांना मंत्रिपद मिळावे म्हणून सोलापूरमध्ये बैठक घेवून पक्षावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याने जिल्ह्यातील सावंत विरोधी लॉबी सक्रिय झाली. आज शिवसेनेतील अनेकांना मुंबईत ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर बोलाविण्यात आले होते, यामुळे तेथे आमदार सावंत यांच्याविषयी काही तरी निर्णय जाहीर होईल असे वाटत होते. मात्र तुर्तास तरी  पक्षशिस्तीच्या कारवाईबाबतची माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना  सोलापूर व उस्मानाबादच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगत संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांचा विषय पुढे न आल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला असला तरी तो मनाला न पटणारा आहे. सावंत समर्थक लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना आजच पक्षातून काढले गेले आहे तर पुरूषोत्तम बरडे यांच्याकडे प्रभारी जिल्हा प्रमुख  पद सोपविण्यात आले आहे.

हे निर्णय बरेच काही सांगून जातात. मागील काही दिवसांपर्यंत उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार सावंत सर्वश्रृत होते. यवतमाळ विधानपरिषदेचे तिकिट त्यांना पक्षाने दिले. ते आमदार झाले व यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात होते. यंदा त्यांना उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघातून विधानसभेला उभे केले गेले व ते विजयी झाले. त्यांना पुन्हा मंत्रिपदाची आशा होती मात्र तीन पक्षांचे सरकार आल्याने शिवसेनेत अनेकांना अपेक्षा असून मंत्रिपद मिळालेली नाहीत.

आमदार सावंत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे मंत्रिमंडळ विस्तारापासून दिसून आले आहे. यातच उस्मानाबाद जिल्हा परिषदेत त्यांनी आपले समर्थक सदस्यांचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी उभे केले. यामुळे सावंत विरोधी लॉबीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या. दोन दिवसांपूर्वी ठाकरे हे मराठवाडा दौर्‍यावर असताना आमदार सावंत यांनी आयोजित बैठकांकडे पाठ फिरविल्याने हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.

आता शिवसेनेने सोलापूरमधील सावंत समर्थक पदाधिकार्‍याला पक्षातून काढल्याने पक्षशिस्तीच्या कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे. शनिवारी सोलापूर व उस्मानाबाद मधील शिवसेनेचे पदाधिकारी उध्दव ठाकरे यांना भेटले आहेत. यात या विषयावर चर्चा झाली असली तरी ती सार्वजनिक न करण्यावर पक्षाचा भर दिसत आहे. सावंत हे पक्षाचे निर्वाचित आमदार आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार आहे व ते अस्थिर करण्यासाठी विरोधी भाजपाकडून सतत प्रयत्न होणार हे निश्‍चित आहे. अशा वेळी घाई गडबडीत आमदाराबाबत निर्णय घेण्याचे शिवसेना टाळत असल्याचे दिसत आहे. 

काही दिवसापूर्वीच राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते व दोन दिवस यावर बरेच मंथन झाले होते. तो विषय चर्चेने संपला होता. आता शिवसेनेने सोलापूर व उस्मानाबद मधील पक्षाअंतर्गत विषयात लक्ष घातले आहे. आमदार सावंत यांचे दोन जिल्ह्यात काम आहे. त्यांच्याकडे सोलापूरची सूत्र दिल्यानंतर त्यांनी फेरबदल करून आपल्या समर्थकांना पद दिली होती. यातच विधानसभेला त्यांनी शिवसेनेतील अनेकांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकिट दिली होती, यामुळे ही खूप नाराजी होती. जुने शिवसैनिक त्यांच्या कामावर नाखूश होते.  आता ही मंडळी सावंत यांच्या विरोधात एकटवली आहेत व त्यांनी मातोश्रीवर जावून बर्‍याच काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या कानावर आज घातल्या असणार हे निश्‍चित.

मागील काही दिवसांपर्यंत शिवसेनेत आमदार सावंत बोले व सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा हले अशी अवस्था होती मात्र आता ती बदलत चालली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आता काय भूमिका घेणार हे लवकरच कळणार आहे. शिवसेना हा शिस्तीचा पक्ष असून येथे पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो. यापूर्वी ही शिवसेनेने आपली ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: