आषाढी एकादशी पर्व काळात विठ्ठल मंदिराला मिळाले एवढे कोटी रूपयांचे उत्पन्न

पार्थ आराध्ये

पंढरपूरः आषाढी यात्रा 2019 च्या कालावधीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला 4 कोटी 40 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असून ते गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीड कोटी रूपयांची अधिक आहे. यात्रा कालावधीत 7 लाख 28 हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आहे. अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी यात्रा नुकतीच संपली असून उद्या रविवारी प्रक्षाळ पूजा होत असून यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणीचे नित्योपचार सुरू होत आहेत. यात्रा कालावधीत देव हा भक्तांसाठी चोवीस तास दर्शनासाठी उभा असतो. दरम्यान या यात्रेत विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 39 लाख 63 हजार 424 रूपये तर माता रूक्मिणीच्या पायावर 7 लाख 72 हजार रूपये अर्पण केले आहेत. भक्तांनी 1 कोटी 84 लाख 54 हजार रूपयांच्या देणग्या दिल्या आहेत तर लाडू प्रसादातून मंदिराला 72 लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासातून 18 लाख 91 हजार तर वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवासातून साडेतीन लाख रूपयांचे उत्पन्न मंदिराला मिळाले आहे. गतवर्षी आषाढीत मंदिराचे उत्पन्न हे 2 कोटी 90 लाख रूपये इतके होते.

आषाढीच्या काळात मंदिरे समितीच्या वतीने भाविकांसाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. भक्तिसागर 65 एकरात तीन लाख भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली होती, नदीपात्रातील सत्तर टक्के भाग हा रिकामा ठेवण्यात आल्याने वारकरी स्नानानंतर नौकाविहार करण्याचा आनंद घेत होते. एसडीआरएफचे जवान पात्रात तैनात करण्यात आल्याने जीवितहानीचे प्रमाण कमी राहिले आहे. 35 जीवरक्षक यावेळी नेमण्यात आले होते. स्थानिक कोळी बांधवांनी यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

यंदा श्री विठ्ठल रूक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांच्या पायाला खडे टोचू नयेत यासाठी आठ किलोमीटर लांब मॅट अंथरण्यात आली होती. तसेच रांगेत भाविकांना बसण्याची सोय ही करण्यात आली होती. येथे अनेक स्वयंसेेवी संस्थांनी वैद्यकीय मदत केली यात भारत सेवाश्रम कोलकता, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कराड, यासह रेडक्रॉस व हरित वारी परिवार यांचा समावेश आहे. गोपाळपूरच्या स्वेरी कॉलेजने शुध्द पाण्याचे वितरण भाविकांना केले आहे. विविध संस्थांचे तीन हजार स्वयंसेवक वारी काळात सेवा बजावत होते. यात्रा कालावधीत वाळवंटात महिलांसाठी चेजिंग रूमची उभारणी वेगाने करण्यात आली होती. तसेच विविध संस्थांनी अन्नदान केले आहे. मंदिरे समितीने दर्शन रांगेत चहा, फराळ, पाणी, भोजन यांची व्यवस्था केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: