शेकाप कडून सांगोल्यात भाऊसाहेब रूपनरांची उमेदवारी, निवडणुकीत चुरस वाढणार
पार्थ आराध्ये
सांगोला- ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम करणारे सांगोला मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी भाई गणपतराव देशमुख यांनी २०१९ ची निवडणूक न लढविण्याचा आपला निर्णय कायम ठेवला व आपला उत्तराधिकारी म्हणून भाऊसाहेब रूपनर यांचे नाव घोषित केले.
दरम्यान देशमुख यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत असले तरी देशमुखांनी वयाच्या ९४ व्या वर्षी थांबणे पसंत केले आहे. १९७२ व ९५ चा अपवाद वगळता ते ११ वेळा आमदार झाले आहेत.
दोन वेळा मंत्रिमंडळात काम पाहिले. मात्र बहुतांश काळ विरोधी बाकावर त्यांनी राहणे पसंत केले आहे. शेतकरी कामगार पक्षाची तत्व कायम पाळली. आज ही ते आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या मुलाला उमेदवारी देवू शकले असते पण त्यांनी तसे न करता भाऊसाहेब रूपनर यांना संधी दिली.
दरम्यान देशमुख निवडणूक रिंगणात नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शेकाप ला पाठिंबा देणे अवघड आहे. यामुळेच येथून दीपक साळुंखे रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. येथून शहाजी पाटील ही निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. आज शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रुपनर यांच्या नावाची घोषणा केली.
आ. गणपतराव देशमुख यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. गेल्या काही दिवसांपासून आ. देशमुख यांनी याबाबत कार्यकर्त्यांची समजूत काढत आपण नवीन कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भाऊसाहेब रुपनर, अॅड. सचिन देशमुख, माजी सभापती बाळासाहेब काटकर, चंद्रकांत देशमुख व बाबा कारंडे या पाच नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये भाऊसाहेब रुपनर यांचे नाव रविवारी निश्चित करण्यात आले.
~~~~~~~~
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi