आमचा गडी लय खंबीर हाय, नाद करणारेच बाद होऊन जातील – रोहित पवार

ग्लोबल न्युज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवारांसह इतरांवर ईडी ने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते व नेते ही आक्रमक झाले. सततच्या या बदनामीमुळे अजित पवार हे व्यथित झाले व त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांनी प्रेस घेऊन हे सर्व का केले याचा खुलासा ही केला. त्यावेळी त्यांनी पवार साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख असून आमचे पवार कुटुंब हे एकच असल्याचे सांगितले. त्याला अनुसरून अजितदादांच्या या निर्णयाचे रोहित पवार यांनी समर्थन करत पवार फॅमिली एकच असल्याचे सांगताना आमचा गडी लय खंबीर असल्याचे फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

त्यांची ही पोस्ट जशीच्या तशी

तुमच्या आमच्यांपैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो , त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा.

माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा , सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत ? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.

मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन कि , पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे कि आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील . मी मागे पण सांगितलं आहे कि अजिबात कशाची काळजी करू नका , आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील.असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया.


ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: