आदित्य ठाकरे शिवसैनिकांना म्हणतात …हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल..

मुंबई महाराष्ट्र संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिथे असाल तिथूनच मला शुभेच्छा द्या. कोरोनापासून स्वतःची काळजी घ्या. हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हितचिंतकांना केले.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा शनिवारी 13 जून रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यावर्षी महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असल्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून आपण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. कोरोनावर मात करणे हेच आपले सर्वांचे ध्येय आहे, त्यामुळे वाढदिवस जल्लोषात साजरा न करता तमाम शिवसैनिक, मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी होर्डिंग, हारतुरे-केक हा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांसाठी करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने हे एक सत्कार्य होईल आणि मला याचा निश्चितच आनंद होईल असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

प्रशासनाला सहकार्य करू या

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करूया आणि प्रशासनाला सहकार्य करुया असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वतःची काळजी घ्या. हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल. तुम्ही आजपर्यंत मला जसे प्रेम आणि आशीर्वाद दिले, तसेच प्रेम आशीर्वाद यापुढेही माझ्यासोबत राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: