आणि ते आमदार सुद्धा झाले … अजित पवारांनी सांगितला किस्सा;वाचा सविस्तर-

…त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावं लागणार – अजित पवार

मुंबई । आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या गळीप हंगामाचा शुभारंभ झाला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पहिलाच जाहीर कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी आपल्या खास शैलीत विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या आठवणी सांगिलतल्या. तसेच राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत 19 नोव्हेंबरला भेट होणार आहे. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता स्थापनेसाठी जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही त्यामुळे तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावं लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काहींना बळजबरीने विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तिकिटं दिली, ते उमेदवारही निवडून आले आणि आमदार झाले, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांनी हा किस्सा आपल्या खास स्टाईलमध्ये सांगितला आणि सभेत एकच हशा पिकला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.

विजय शिवतारेंवर पुन्हा निशाणा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. यावेळी अजित पवार यांनी विजय शिवतारेंना पुन्हा आमदारच होऊन दाखव, असं खुलं आव्हान दिलं होतं. त्यावर आता या जाहीर सभेत अजित पवारांनी पुन्हा भाष्य केलं आहे. ‘विजय शिवतारे हे साहेब राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायचे, म्हणून मी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बोललो होतो. कसा आमदार होतोय तो. त्याप्रमाणे पुरंदरमध्ये संजय जगताप निवडून आले,’ असं अजित पवार म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: