जाणून घ्या आषाढी वारीचा गोपाळपूर काला,वाचा सविस्तर-

कंठी धरीला कृष्णमणी ।अवघा जनी प्रकाश ॥
काला वाटू एकमेका ।वैष्णव निका संभ्रम  ॥
वाकुलिया ब्रम्हादिकां ।उत्तम लोका दाखवूं ॥
तुका म्हणे भूमंडळी ।आम्ही बळी वीर  गाढे ॥

पंढरपूर मुक्काम  व गोपाळकाला

आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशी पालख्यांचा मुक्काम पंढरपूरात असतो . पंढरपूर मुक्कामी रोज सकाळी पूजा , सकाळ , संध्याकाळ कीर्तन व रात्री जागर (रात्रभर केले जाणारे भजन ) होतो . 
द्वादशीच्या दिवशी सकाळी उपास सोडतात. रात्री कीर्तनानंतर खिरापत होते . 
त्रयोदशी , चतुर्दशी सुद्धा वरीलप्रमाणे कार्यक्रम होतात .

गोपाळपूर काला


वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता गोपाळकाल्याने होते. आषाढी वारी सुद्धा याला अपवाद नाही. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पालख्या गोपाळपूरला काल्यासाठी जातात. गोपाळपूरला जाताना काही पालख्या पुन्हा एकदा चंद्रभागा स्नानासाठी थांबतात.

गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून २ किमी अंतरावर आहे . या ठिकाणी टेकडीवर भगवान गोपाळकृष्णाचे मंदिर आहे . विविध दिंड्या व पालख्या पहाटे पासून या ठिकाणी येऊन काला करतात . पालखी या ठिकाणी आल्यावर गोपाळपूर परिसरात ठरलेल्या ठिकाणी थांबतात . पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते . त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते. यानंतर पालखी पुन्हा पंढरपुरात परत येते .

वारीची परिपूर्ती नेमकी कशामध्ये ?


या लेखमाला निमित्ताने अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे कि, सर्व वारकऱ्यांना मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन होत नाही तरी मग वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळते का ?
वारी हे जसे साधन आहे तसेच एकप्रकारे साध्य सुद्धा आहे. वारकरी वारीमध्ये समविचारी लोकांसमवेत भजन करत जाण्याचा आनंद लुटतात. वारीमधील आनंद हेच वारीचे महत्वाचे लक्ष्य आहे. पंढरपुरात पोचल्यावरसुद्धा आषाढी एकादशीचा मुख्य आचार म्हणजे – चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा व भजन कीर्तन आदी कार्यक्रम हा आहे. 
वारीच्या काळात देव वाळवंटात ( चंद्रभागेच्या किनारी असलेला वालुकामय प्रदेश ) असतो. व कळस दर्शन झाले तरी पुरेसे आहे अशी वारकऱ्यांची समजूत आहे. 
पंढरपुरात देव कोठे आहे याचे वर्णन करणारा संत जनाबाईंचा अभंग प्रसिद्ध आहे. 
संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होतो ।।
तेथे असे देव उभा । दिसे (जैसी) समचरणाची शोभा ।।
त्यामुळेच पालखी सोहळ्याला दोनशेहून अधिक वर्षे झाली तरी पालखी विठ्ठल मंदिरात दर्शनास नेण्याची पध्द्त नव्हती. आता गेल्या पंधरा वीस वर्षात ही पध्द्त सुरु झाली आहे.

वर लिहिल्याप्रमाणे नवीन प्रथेनुसार पालख्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात .

दुपारी नैवेद्य – जेवण होऊन पालखी परतीच्या प्रवासाला निघते . यावेळेस निळोबारायांचा पुढील अभंग म्हटला जातो . 
पंढरीहूनि गावा जाता । खंती वाटे पंढरीनाथा ।।
आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ।।
सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।
यावेळेस अनेक पंढरपूरकर पालख्यांना निरोप देण्यासाठी येतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: