आजी आणि तिचा शृंगार…नव्या पिढीच्या मुलींनो नक्की वाचा
आजही आठवते आजीची शृंगारपेटी… आजीची नटण्या-सजण्याची सोबतीण… हो.. त्यात असायची कुंकवाची डबी.. कुंकू पण स्पेशलच.. विठुरायाच्या दारातलं, पंढरपूरचं! दरवर्षी आषाढी वारीसाठी आजोबा पंढरपूरला जायचे… तेव्हा येताना वर्षभर पुरून उरेल एवढं कुंकू आणायचे….
हळदीची डबी, कुंकू लावण्याआधी लागणाऱ्या मेणाची डबी पण सोबत असायची… मधाच्या पोकडीतील मध खाऊन राहिलेला चोथा आजी टाकू द्यायची नाही… सगळा चोथा गोळा करून स्वच्छ धुऊन तो एका पातेल्यात घेऊन त्यात थोडं खोबरेल तेल टाकून ते चुलीवर चांगलं कढवून घ्यायची….
गरम होताच ते विताळायचं…. एकदा का ते विताळलं की दुसऱ्या ताटात ओतलेल्या थंड पाण्यात गरम असतानाच ओतायचं… थंड पाण्यामुळे आणि हवेमुळे ते घट्ट असं मेन बनायचं… बनलेल्या पिवळ्या जर्द मेणाचा गोळा आजी एका डबीत भरून ठेवायची…. शृंगारपेटीत मोठ्या दातांचा कंगवा, छोट्या दातांचा कंगवा, छोटी फणी, बाजूने लोखंडी पत्र्याची बॉर्डर आणि मागे उभे करण्यासाठी तारेचा खटका असलेला आरसा, वेणीला लावण्यासाठीच्या दोन-तीन रंगीत रेबिनी एवढं साहित्य असे…
दररोज सकाळी सूर्य उगवायच्या आतच आजीची अंघोळ झालेली असे… वेणी-फणी करून पूर्वेला सूर्य उगवत असायचा तोच आजीच्या कपाळीही सौभाग्याचा सूर्य कुंकवाचा टिळा दिमाखात झळकायचा….
मला आठवते अजूनही… आजी बदामाकृती आकाराचा कुंकवाचा मोठ्ठा टिळा लावायची… आधी कपाळावर कुंकू लावणार त्या जागेत मेण लावून घ्यायची…. नंतर चिमटीत कुंकू घेऊन चांगले चार-पाच थरांचा टिळा लावायची…. टिळा बदामाकृतीत कोरावा लागत असे…
अंगावरील नऊवारी साडीच्या पदराचं एक टोक घेत असे, आणि त्या पदराने कुंकवाच्या टिळ्याला आकार देत असे… असं दोन ते तीन मिनिटं वेळ घालवून लावलेला कुंकवाचा टिळा घाम येऊ दे, काय होऊ दे पण उद्या सकाळपर्यंत कपाळीचा हलत नसे…
पांडुरंगाची भक्त असल्याने, आणि भजन- कीर्तनात सक्रिय सहभाग असल्याने अबीर लावायला कधी चुकत नसे…
गळ्यात तुळशीची माळ, नऊवारी लुगडं, चोळी, तेल लाऊन चापून-चुपून घातलेला केसांचा अंबाडा, कानात सोन्याची कर्णफुले, नाकात गोळ्याची मोठी चमकी(लग्न-कार्यात नथ घालत असे)…
गळ्यात पोत, काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आणि बोरमाळ, हातात हातभरून हिरव्यागार बांगड्या, बांगड्यांच्या पाठीमागे सणाला घातलेले लाखेचे भिंगांचे चुडे, डाव्या हातात बांगड्यांत असलेली एक काळी रबरी बांगडी(मी विचारायची ही काळी बांगडी का घातली आहेस? ती का घातली होती ह्याच उत्तर आजीने कधीच दिले नाही) पायात नऊ भाराची मोठी चांदीची जोडवी आणि कपाळी मोठा कुंकवाचा टिळा…. असं लेणं ल्यालेली माझी गोरीपान आजी अगदी गौरीवानी दिसे….
आजी देवाघरी गेली, आता तिची शृंगारपेटीही रिकामी झाली….
बालपणीच्या_आठवणी
जिजाऊंची लेक सातारकर[Aru]