आंबेडकरी चळवळीतील विचारवंत राजा ढाले यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.

सत्तरीच्या दशकात आंबेडकरी तरुणात क्रांतिकारी विचार जिवंत करणारा, तथागतांचा वारसदार, सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शिदनाक नंतर झालेला आंबेडकरी वैचारिक वारसदार आपल्यातून आज निघून गेला. कोणाच्याही बापाला न घाबरता धर्मचिकित्सा व सामाजिक विद्रोह करणारा विद्वान लेखक स्वतःच्या मताशी ठाम राहणारा, सत्तेसाठी आपल्या विचाराशी समजोता न करणारा निर्भीड वक्ता, ज्वालामुखी सारखा वक्तव्य करणारा त्सुनामी आपल्यातून हरपला. “स्वातंत्र कोणत्या गाढवीचे नाव आहे “ हे वक्तव्य करून महाराष्ट्रात धुमाकूळ घातला, कारण स्वातंत्र आमच्या उपयोगाचे झालेच नाही या स्वातंत्र्याचा फायदा आमच्यापर्यंत पोहचलाच नाही, असे ठणकावून सांगणारा कायम बौद्ध विचाराचा ध्यास घेणारा नेता म्हणजेच राजा ढाले.

दलित तरुणांमध्ये क्रांतीची बीजे पेरणारा दलित पँथरचा खरा संस्थापक रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणजेच राजा ढाले. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज मध्ये विद्रोहाची पहिली ठिणगी टाकून पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराचे सत्य जनतेपुढे आणले. जहाल बौद्ध विचारक व सच्चे आंबेडकरवादी म्हणून स्मरणात राहतील.

माझे आजोबा ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू असताना राजा ढाले, अरुण कांबळे, रामदास आठवले या जहाल पँथरच्या कायम संपर्कात असत त्यावेळेस ते म्हणत राजा ढाले हा तरुण एक दिवस क्रांतिकारी लढाई लढणार.

सत्तरीच्या दशकात जीवाची बाज़ी लावणारे अनेक पँथर राजा ढाले यांनी निर्माण केले. जे जे दलितांवर अन्याय करत होते त्यांना राजा ढाले नावाची दहशत वाटत होती. साहित्य ही कोणा एका समाजाची बटीक नाही, स्वप्नातील साहित्य लिहण्यापेक्षा अस्सल मातीतील साहित्य याच दलित पँथरच्या मुलांनी सुरु केलं व आपला अग्नितांडव वैचारिक विद्रोह भारताच्या नव्हे तर जगाच्या जनतेपुढे मांडला.

याच्यामागे राजा ढाले यांचे मोठे योगदान होते परंतू राजा ढाले यांनी भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होत त्या स्वप्नाची प्रतिपूर्ती केल्याने खरी आदरांजली राजा ढाले यांना होईल. आताच्या तरुणांनी राजा ढाले यांचा आदर्श आपल्या उराशी बाळगावा व पुस्तकाद्वारे आपल्या व्यथा मांडाव्यात. आज आर पी आय खरात पक्ष व्यथित अंतकरणाने राजा ढाले यांना अभिवादन करत आहे.

– सचिन खरात

ग्लोबल न्युज नेटवर्क: