तरडगांव/औदुंबर भिसे
टाळ, मृदुंगाच्या गजर व हरीनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वामागून अश्व दौडले आणि माऊली….माऊली नामाचा जयघोष सुरू झाला. अशा अल्हाददायक व उत्साही वातावरणात श्री संत ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आयुर्वेद सिटी येथे पार पडले. सायंकाळी हा सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला.
लोणंद मुक्कामी कोकण, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. दीड दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी १ वाजता माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
दुपारी २ वाजता कापडगांव येथे सोहळ्याचे फलटण तालुकावासियांनी स्वागत केले. उभ्या रिंगणासाठी दुपारी ३.३० वाजता अश्व आयुर्वेद सिटी येथे दाखल झाले. चोपदारांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी चार वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले. अश्व २७ दिंड्या पार करून रथाच्या दिशेने धावत गेले. समोर स्वाराचा अश्व तर मागे माऊलींचा अश्व दौडत होता. वारकर्यांच्या मुखी माऊली…माऊली नामाचा जयघोष आणि साथीला टाळ, मृदुंगाचा गजर सुरू होता. अशा वातावरणातच स्वाराचा व माऊलींचा अश्व मागे २० दिंड्यांपर्यंत जावून पुन्हा माऊलींच्या रथाकडे निघाले. वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत दोन्ही अश्व माऊलींना प्रदक्षणा मारून व नारळ प्रसाद घेवून गर्दीतून वाट काढीत सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचले. रिंगण सोहळा झाल्यानंतर हा सोहळा तरडगांवकडे मार्गस्थ झाला.
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्हार खुर्द, हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील हजारो भाविक उपस्थित झाले होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगांव येथे सायंकाळी हा सोहळा पोहोचला. त्यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या (गुरुवार) हा सोहळा फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.