अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर, हा नेता होणार आता काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष ?

नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात  व देशात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसनं मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर, प्रदेशाध्यक्षपदी आता माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांची निवड होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती. पण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळाली असून लवकरच याबाबतची घोषणा होणार आहे. दरम्यान दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली असल्याचे कळतं.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत असून राहुल गांधी देखील आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्यात देखील काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा देखील पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात 2009 मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात.
तसेच नुकतीच त्यांची काँग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून ही निवड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नुकताच भाजप प्रवेश केलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे थोरात he कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: