अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शिवसेना ठाम, भाजपकडून लेखी प्रस्ताव आल्यानंतरच चर्चा होणार – संजय राऊत

मुंबई । राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा 13 दिवसानंतरही सुटलेला नाही. हा तिढा कसा सोडवता येईल यासाठी राज्यातील नेते दिल्लीमधील बड्या नेत्यांच्या भेटागाठी घेत आहेत. त्यातच राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

यावरुनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पवारांबरोबर बोलणे झाले का असा सवाल पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला तेव्हा ते संतापले. ‘हो माझं शरद पवारांशी बोलणं झालं. मी काहीही लपवत नाही,’ असं उत्तर राऊतांनी दिले. इतकचं नाही तर आमच्या चर्चेने ज्यांना पोटशूळ उठलाय त्यांच्या चर्चांबद्दल आम्हाला ठाऊक आहे असा टोलाही राऊत यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे. तसेच राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शिवसेना ठाम, भाजपकडून लेखी प्रस्ताव आल्यानंतरच पुढील चर्चा होणार असल्याच मत संजय राऊत यांनी मांडले आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला नवा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री बनविण्यावर चर्चा होऊ शकते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे.

गेल्या 12 दिवसात भाजपकडून आलेलं हे पहिलंच समंजसपणाचं निवेदन आहे. अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद घेण्याची भूमिका आधीच घेतली असती तर एवढा वाद झालाच नसता, असं सांगतानाच शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही कसं म्हणता? निवडणुकी आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरलं तोच प्रस्ताव होता. त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची गरज काय? शहा यांनी राजमुद्रा उमटवलेल्या प्रस्तावाचीच अंमलबजावणी झाली पाहिजे. हा वनलाइन प्रस्ताव आहे. हाच प्रस्ताव भाजपनं लिखित द्यावा. मगच पुढची चर्चा होईल, असं राऊत यांनी ठणकावलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: