सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सातारा येथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आज ते सोलापूर येथील इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेत आहेत. या मुलाखतीला सोलापुरातील दोन विद्यमान आमदारांनी अनुपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान आजच्या मुलाखतीकडे राष्ट्रवादीचे माढ्या चे आमदार बबनराव शिंदे,बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी पाठ फिरवली आहे. बबनराव शिंदे भाजपमध्ये तर दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि सोपल हे दोघे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत मात्र पवार सोलापुरात असताना उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तर दिलीप सोपलही पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन आमदार राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी गेले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेनं वेग पकडला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली.
मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामध्ये काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम आणि काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचाही समावेश आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी व Filmy Marathi चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा