अजितदादांच्या त्या बोलण्या व पाठबळामुळे निढळ गावात आज दिसत आहेत लाखो झाडे

अमित परंडकर

राज्यात सर्वच क्षेत्रात आदर्श असणारी जी काही गावं तयार झाली आहेत. त्यातील एक असणारे व राज्य शासनाच्या सर्व योजनांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे जिंकून एक सक्षम गाव गावातील सक्षम नागरिक झालेले गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील निढळ या गावाकडे पाहिलं जातं.

या गावात आज झाडे आहेत असे म्हणण्यापेक्षा झाडात गाव आहे असे म्हणावेसे वाटते. आज गावात तब्बल तीन लाखापेक्षा जास्त झाडे आज डौलाने उभी राहिली आहेत. गावात ही झाडे वाढण्याचे एक कारण आहे. याची आठवण गावचे सुपुत्र व माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी सांगितली.2000 साली गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानिमित्ताने सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी गावकरी गेले.अजितदादा भल्या सकाळी सात वाजता गावात आले गावाची पाहणी केली. कौतुक केले, मात्र भाषणात त्यानी आपल्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावाप्रमाणे गाव चागले आहे, पण गावात झाडांची संख्या कमी आहे त्यामुळे झाडे लावा असे सांगितले. तसेच त्यासाठी मी एक लाख रुपये देतो असे म्हणाले. कार्यक्रम संपतातच पीए ला बोलावून घेत 1 लाख रुपये रोख सरपंचाकडे दिले. त्यातून प्रेरणा घेत गावाच्या शिवारात व गावात दरवर्षी हजारो झाडे लावली गेली. त्यांचे संगोपन करून आज ही झाडे मोठी झाली असून ती गावचे वैभव ठरली आहेत. उन्हाळ्यात देखील सर्वत्र हिरवीगार झाडे दिसल्याने मन ही प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी आदर्श गाव संकल्पना रुजवली तेव्हा या संकल्पनेच्या आधारे अशी अनेक गावे आदर्श करण्याचे प्रयत्न झाले आणि हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काही गावे उभीही राहिली. पण एकूण गावांची संख्या आणि ग्रामीण भागात उग्र होत चाललेले प्रश्न पाहता त्यांची स्थिती मोजक्या बोटांसारखी आहे. याचा अर्थ आदर्श गावाचे असे काही मॉडेल होऊ शकत नाही हेच इतक्या वर्षांत समोर आले. या पार्श्वभूमीवर निढळचा प्रयोग महत्त्वाचा वाटतो आणि ज्या ज्या गावांत नेतृत्व उभे आहे आणि इच्छाशक्ती आहे त्यांच्यासाठी तो पथदर्शी ठरावा. या प्रयोगाला आता तब्बल ३५ वर्षे झाल्यामुळे तो शाश्वत ठरू शकतो, असे म्हणता येईल.

खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि शहरी ग्रामीण ही दरी कमी व्हावी याची मूळ जबाबदारी सरकारची आहे. मात्र लोकसहभाग नसेल तर सरकारही काही करू शकत नाही. शिवाय सरकार आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नसल्याने गावाच्या गरजा त्या भागवू शकत नाहीत. गेल्या काही दिवसांतील एक बदल म्हणजे गावातील काही लोक, गावाबाहेर गेलेले लोक श्रीमंत झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था मात्र गरीब झाल्या. गावातील श्रीमंत आणि त्या गावातील बाहेर गेलेल्या नोकरदार, व्यावसायिकांना आपले गाव सुधारण्याची साद घातली तर? आपण सरकारी पदांवर काम करत असलो तरी एका गावाला सरकारच्या तिजोरीतून फार काही देऊ शकत नाही याची जाणीव झालेल्या चंद्रकांत दळवी यांनी नेमके हेच हेरले.

एक समृद्ध खेडे कसे असू शकते याचे दर्शन निढळच्या रूपाने झाले. अजून पुरेसा पाऊस झाला नसतानाही पाणलोट, जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामांमुळे पाण्याने भरलेल्या विहिरी आणि ओढे, गावाचा स्वच्छ परिसर, दरवर्षी झाडे लावल्यामुळे आणि चाराबंदीमुळे सर्वत्र दिसणारी झाडी, गावकऱ्यांनी लक्ष घालून करून घेतलेले उत्तम रस्ते, गावाच्या शिवारात सर्वत्र दिसणारी हिरवीगार शेती, आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत आणि पत निर्माण व्हावी यासाठी स्थापन झालेली नीलकंठेश्वर पतसंस्था (या पतसंस्थेची आता मुंबईत एक शाखा आहे.), लेखापरीक्षणात सतत ‘अ’ वर्ग मिळवणारी विविध कार्यकारी सेवा संस्था, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आणि या सर्वांच्या टुमदार इमारती, विश्वास बसणार नाही इतके मोठे आणि चकाचक ग्रामपंचायत कार्यालय आणि कामांत व्यग्र असलेले गावकरी. आधुनिक काळाच्या गरजा म्हणून जे जे गावात असावे असे वाटते ते सर्व काही या गावात आज पाहायला मिळते. गावाच्या मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटवून तेथे जॉगिंग पार्क, लॉन, पोहण्याचा तलाव ही कामे सध्या सुरू आहेत. 
या गावाविषयी सविस्तर माहिती लवकरच….

ग्लोबल न्युज नेटवर्क: