पुणे: शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निर्माण झालेल्या तिढ्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. देशपातळीवरील पोलीस महासंचालकांची परिषद यंदा पुण्यात होत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात दाखल झाले आहेत. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी मोदींचं स्वागत केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईकडे निघाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा उपस्थित होते. युतीमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यानंतर मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने सर्वांच्या नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटंलं होतं की, आपण दिल्लीत मोठ्या भावाची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) भेट घेईल. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि लहान भाऊ-मोठ्या भावाची भेट झाली.
देशपातळीवरील पोलीस महासंचालकांची परिषद यंदाच्या वर्षी पुण्यात होत आहे. ही परिषद ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. गेल्यावर्षी ही परिषद गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. यंदाची परिषद ही महाराष्ट्रात होणार हे यापूर्वीच ठरलं होतं आणि त्यानुसार ही परिषद पुण्यात होत आहे.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती करुन निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा. मात्र, फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावरुन शिवसेना-भाजपत दुरावा निर्माण झाला. अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकत्र घेत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. तसेच राज्यात सत्ताही स्थापन केली.
दरम्यानच्या काळात शिवसेना-भाजपत निर्माण झालेल्या दुराव्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपने एनडीएमधून शिवसेनेला बाहेर काढल्याची घोषणा भाजपने केली. या सर्वांमुळे दोन्ही पक्षांत आणखी दुरावा निर्माण झाला.