अकलूज-माळेवाडी नगरपरिषद तर नातेपुते व श्रीपूर-महाळुंगचे नगरपंचायतीत रूपांतर
मुंबई- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करत माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी या दोन स्वतंत्र ग्रामपंचायतींची एक नगरपरिषद तर श्रीपूर- महाळुंग व नातेपुते येथे नगरपंचायत स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. अखेर विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी याची घोषणा झाली असून अकलूज व माळेवाडी या शेजारी शेजारी असणार्या दोन ग्रामपंचायतींचे एकत्रिकरण करून अकलूज नगरपरिषद स्थापन होत आहे.
याच बरोबर माळशिरस तालुक्यातील मोठे गाव असणार्या नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीमध्ये करण्यात आले आहे. यापूर्वी माळशिरस येथे नगरपंचायत स्थापन करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर व महाळुंग या दोन गावांची एक नगरपंचायत आता निर्माण करण्यात आली आहे. शासनाच्या नगर विकास विभागाचे उप सचिव सतीश मोघे यांनी याबाबतची उद्घोषणा बुधवारी जारी केली आहे.
याबाबत कोणाला आक्षेप असल्यास ही उद्घोषणा राजपत्रात प्रसिध्द झाल्या पासून तीस दिवसांच्या आत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी कारणे सादर करणे आवश्यक आहे.अकलूज नगरपरिषद हद्दीत अकलूजचे गावठाण सर्व्हे नंबर 1 ते 170 असणारे संपूर्ण महसुली क्षेत्र व माळेवाडी (अ) गावचे सर्व्हे 1 ते 87 मध्ये असणारे सर्व महसुली क्षेत्र समाविष्ठ करण्यात आले आहे.
तसेच नातेपुते नगरपंचायतीमध्ये या गावचे गावठाण व गट नंं. 1 ते 811 मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र समाविष्ठ आहे. तर श्रीपूर- महाळुंग नगरपंचायतीमध्ये श्रीपूर व महाळुंग या दोन्ही गावांची गावठाण व ग्रामपंचायतीमध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र घेण्यात आले आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.