“लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब” राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा !

आज कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल २,५८,३१७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोनामुळे परिस्थिती अतिशय विदारक बनत चालली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब” असल्याचं म्हणत जोरदार टोला लगावला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो” असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे.

 

Team Global News Marathi: