विरारमध्ये ११ वर्षीय मुलीवर तीन तरुणांचा सामूहिक बलात्कार

 

विरार येथील एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या २१ वर्षीय मैत्रिणीच्या सांगण्यावरून तीन तरुणांनी बुधवारी पहाटे सामूहिक बलात्कार केला. या आरोपी मैत्रिणीसह तीन आरोपींना पोलिसांनी सहा तासांत अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास पीडित मुलगी तिचा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी तिच्या घराजवळील दुकानात गेली होती. तिथे तिला तिची २१ वर्षीय मैत्रिण भेटली, त्यानंतर ती मैत्रिणीसोबत फिरायला गेली.

फिरत असताना काही वेळाने त्या मुलीला मैत्रिणीने विरार पश्चिम येथील एका निर्जन ठिकाणी नेले. यावेळी त्या मैत्रिणीने त्या ठिकाणी आपल्या तीन मित्रांना बोलावले. मध्यरात्री दीड वाजता ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मुलीला गणेशोत्सवासाठी बांधलेल्या मंडपाच्या मागे नेले. याठिकाणी आरोपी मैत्रिणीने मुलीला पकडून ठेवले व मैत्रिणीच्या सांगण्यावरून या तीन नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मुलीला तिच्या घराजवळ सोडले.

पीडित मुलीच्या मैत्रिणी तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला याआधी फटकारले होते. मुलगी रात्रभर घरी न आल्याने आई-वडिलांनी तिचा शोध सुरू केला होता. पीडित मुलगी घरी पोहोचल्यानंतर तिने पालकांना बलात्काराची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आईने विरार पोलिसांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या तपशिलाच्या आधारे पोलिसांना घरापर्यंत आरोपींचा माग काढण्यात यश आले. आरोपींपैकी एक महाविद्यालयीन विद्यार्थी असून दुसरा भाजीविक्रेता आहे. हे दोघेही विरारचे रहिवासी आहेत.

Team Global News Marathi: