मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबीत

मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबीत

सोलापूर :(प्रतिनिधी) तक्रारदाराच्या तक्रारीनंतर संशयित आरोपीविरुध्द मोहोळ पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. त्यानंतर संबंधित संशयित आरोपीला अटक करुन जेलमध्ये टाकले. त्याला जाणिवपूर्वक त्रास दिल्याचा ठपका ठेवत मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सहायक पोलिस निरीक्षक सलीम शेख आणि पोलिस नाईक सुहास पवार या तिघांना निलंबीत केल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘पत्रकारां’शी बोलताना सांगितले.

मोहोळ तालुक्‍यातील आष्टी (शेटफळ) येथील ग्रामपंचायतीच्या जागेत अनिकेत पाटील यांनी मुरुम टाकला होता. त्यानंतर तक्रारदाराने ती जागा माझी आहे म्हणून तिथे दुकान थाटले. परंतु, अनिकेत पाटील यांनी ते दुकान मोडून टाकले. त्यानंतर तक्रारदाराने मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाटीलविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तुझ्याविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल होईल.

त्यामुळे 25 हजार रुपये देऊन भांडण मिटवून घे, असे संबंधित पोलिसांनी अनिकेत पाटील यास सांगितल्याची चर्चा आहे. दरम्यान, पाटील यास वरिष्ठाच्या परवानगीशिवाय जेलमध्ये टाकून जाणिवपूर्वक त्रास दिला. तशी तक्रार अनिकेत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याअनुषंगाने तपास करण्याचे आदेश डीवायएसपी प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी (ता. 18) दिले. त्यानंतर तत्काळ चौकशी करुन शिंदे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला.

त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज पाटील यांची नगरला बदली झाली असून त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. प्रामाणिकपणाची कदर करणे आणि गैरप्रकार तथा अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्यांना शिक्षा करणे ही पाटील यांची खासियत राहिली आहे.

डीवायएसपी शिंदे यांच्या अहवालानुसार निलंबीत
वरिष्ठाची परवानगी न घेता किरकोळ गुन्ह्यातील संशयित आरोपीला लॉकअपमध्ये टाकणे, त्याला जाणिवपूर्व त्रास देणे अपेक्षित नाही. डीवायएसपी प्रभाकर शिंदे यांच्या अहवालानुसार मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एका पोलिस कर्मचाऱ्यास निलंबीत केले आहे.

– मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

प्रभारी पोलिस निरीक्षकही रजेवर
मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे हे रजेवर गेले असून त्यांच्याकडील पदभार आशितोष चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, आता तेही रजेवर गेल्याची माहिती पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. दरम्यान, मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबित केला आहे. त्यामुळे आता ठाण्यात पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: