“भारतीय जनता पक्षाकडे ना निती आहे, ना नियोजन आहे – अशोक चव्हाण

आसाम  : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण आसाम दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी बैठकीत भारतीय जनता पक्षाचे वाभाडे काढले तसेच सत्तेत आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे वचन दिले. आसाम प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राजीव भवन येथे पदाधिकाऱ्यांशी चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने सर्वसामान्यांच्या अपेक्षा जाणून निर्णय घेतले आहेत. केंद्रातील युपीएचे सरकार असो वा विविध राज्यातील काँग्रेसची सरकारे असो, त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे पालन केले आहे.

तसेच भाजपचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत मतांचे धृवीकरण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो. देशातील त्यांची एकही निवडणूक हिंदू-मुसलमान, देशभक्ती आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर नेल्याशिवाय पूर्ण होत नाही. ‘फोडा आणि झोडा’ हीच भाजपाची एकमेव निती आहे. अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि आसमाचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय प्रवक्ते प्रो. गौरव वल्लभ, वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस आमदार अमित झनक, आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाच्या प्रमुख बबिता शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Global News Marathi: