ते आले, त्यांनी पाहिलं आणि सारं काही लुटून नेलं ..काय आहे पुणे जिल्ह्यातील घटना

ग्लोबल न्यूज: पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपरखेड भागात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रवर गुरुवारी दुपारी दरोडा घालण्यात आला. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

इतका ऐवज केला लंपास

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा पडला असून, दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट घातलेले 5-6 दरोडेखोर सिल्वर रंगाच्या मारुती सियाजमधून आले. बँकेतील कर्मचारी व ग्राहकांना पुस्तुलीचा धाक दाखवत त्यांनी तब्बल 2 करोड रुपयांचे सोने आणि 31 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या गाडीच्या पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. या गाडीतून आरोपी अहमदनगरच्या दिशेने पळून गेले आहेत.

पोलिसांकडून आवाहन

बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला, पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे. आसपासच्या गावांमध्ये ही गाडी आणि संशयित आढळल्यास तात्काळ मंचर पोलिस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: