मुलानेच बापाचा काढला काटा ! टेम्भुर्णी येथील खुनाचा 24 तासात पोलिसांनी केला उलगडा

बाहेरख्याली बापाचा खून : मित्रांना दिली 7 हजार रुपयांची सुपारी

शिराळ टेम्भुर्णी येथील संजय मारुती काळे ( वय 55 वर्षे ) यांच्या खुनाचा उलगडा 24 तासात लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वडिलांचे वर्तन आणि त्रासाला कंटाळून मित्रांच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे मुलाने कबूल केले आहे. या संदर्भात पोलिसांनी मुलांसह त्याच्या 2 मित्रांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयत संजय काळे

या प्रकरणी आकाश संजय काळे ( वय 20 वर्षे , रा शिराळ टें. ) लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे ( वय 27 वर्षे ) आलम बासू मुलानी ( वय 33 वर्षे, दोघेही रा. सुरली, ता माढा ) याना पोलिसांनी अटक केली आहे.

संजय काळे या बेकरी चालकाचा निर्घृण खून करून त्यांच्या पीक अप वाहनसह मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सोमवारी उघडकीस आले होते.

संजय काळे यांचा शनिवारी रात्री 9 नंतर अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. आणि मृतदेह ( शेवरे ता. माढा ) हद्दीतील उजनी काळव्याजवळ नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत टेम्भुर्णी पोलिसात मयत संजय काळे यांचा मुलगा आकाश काळे याने फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

चौकशी दरम्यान फिर्यादी आकाश काळे आणि त्याच्या आईच्या सांगण्यात तफावत आढळुन आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुलगा आकाश याने खुनाची कबुली दिली.

वडील बाहेरख्याली होते, घरात सतत भांडणे करीत होते आणि घालून पाडून बोलत होते. त्याला कंटाळून संजय काळे यांच्या खुनाचा कट टेम्भुर्णी येथील हॉटेलात रचला. खून करण्यासाठी लक्ष्मण बंदपट्टे यास रोख 7 हजार रुपये दिले.

त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अंगणात झोपलेल्या वडिलांचा संजय काळे आणि आरोपींनी मिळून खून केला व मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 24 तासात खुनाचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: