पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया ..म्हणाले…

मुंबई : पूजा चव्हाण  या बीडमधील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल  होत असून त्या क्लिप्समधील आवाज महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्याचा असल्याचं भाजपने म्हटलं. त्यानंतर भाजपने थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड  यांच्यावर आरोप केला. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारची चांगलीच अडचण निर्माण झाली. या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? 

विरोधकांकडून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहे या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “या प्रकरणात चौकशी करण्यात येईल आणि सत्य सर्वांसमोर येईल. ज्यांच्यावर कारवाईची करण्याची गरज असेल ती करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल. गेले काही दिवस, महिने काही वेळा असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर असाही प्रयत्न केला जाता कामा नये आणि सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. यामध्ये जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीअंती समोर येईल.”

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – चित्रा वाघ

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलं, “पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी याबाबत स्यु-मोटो अंतर्गत तक्रार दाखल करायला हवी. या सर्व ऑडिओ क्लिप्स, फोटोजचा गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातूंन येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख हा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.”

पूजाची आत्महत्या नसून हत्याच – चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी म्हटलं, “पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स आपल्यासमोर गेल्या दोन दिवसांत आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास १० ते ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत काही फोटोज आलेले आहेत. त्या ऑडिओ क्लिप्समधून तिला आत्महत्येला परावृत्त करण्यापासून तिची आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाइल ताब्यात घे असं सांगताना मंत्री हे अरुण राठोड माणसाला सांगतायत हे आपण सर्वांनी ऐकलं. पोलीस याबाबत अद्याप स्पष्टता देत नाहीयेत.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: