दीपाली चव्हाण आत्महत्या; उपवनसंरक्षक शिवकुमारला अटक

वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाणांच्या कुटुंबीयांचे धरणे आंदोलन

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल वनक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. या प्रकरणी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्य आणि बेलदार समाज संघटनेने त्यांचे शव ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे. सध्या शवविच्छेदन गृहासमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. उजव्या हाताने डाव्या छातीवर गोळी झाडून त्यांनी आपले जीवन संपवले. तत्पूर्वी त्यांनी लिहलेले मृत्यूपत्र व्हायरल केले आणि आईला व पतीला वेगळे पत्र पाठवले. ते पत्र त्यांनी बघताच हरीसालला फोन करुन तिच्या घरी जाऊन परिस्थिती बघण्यासाठी सांगितले. त्यावेळी दिपाली यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून मिळणाऱ्या वागणूकीमुळे त्रस्त झालेल्या चव्हाण यांनी वरिष्ठांना लिहलेले पत्र समोर आले आहे. दरम्यान आज सकाळी बंगळूरूला पळून जात असताना शिवकुमार यांना नागपूर स्थानकामधून पोलीसांनी अटक केली आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रेड्डी हे गायब आहेत.

आत्महत्येच्या पूर्वी त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांना लिहलेले पत्र समोर आले आहे. यामध्ये चव्हाण उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीमुळे त्या त्रस्त असल्याचे दिसते. तसेच शिवकुमार यांच्या वागणूकीला रेड्डीचाही पाठिंबा असल्याचे पत्रात लिहले आहे. आज सकाळपासून दिपाली चव्हाण यांच्या मृत शरीराचे शवविच्छेदन सुरू आहे. दरम्यान त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दिपाली यांच्या पतीने शव स्वीकारण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत क्षेत्र संचालक रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत शव स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचे पती आणि कुटुंबियांनी घेतली आहे. मात्र, क्षेत्र संचालक रेड्डी हे कालापासून गायब आहे.

दरम्यान या आत्महत्येप्रकरणी आज सकाळी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली आहे. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेल आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: