एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले, पाकिस्तानातून जोधपूरमध्ये आले होते

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर येथे आज (रविवार) एक मोठी घटना उघडकीस आली आहे. जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्वच्या सर्व पाकिस्तानी शरणार्थी आहेत.   मृतांमध्ये ६ प्रौढ आणि ५ लहान मुलांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, विषारी गॅस किंवा विषारी पदार्थ्यांच्या सेवनाने या सर्वांचा मृत्यू झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या लोकांचा मृत्यू झाल्याने जोधपूरमध्ये खळबळ माजली आहे.

देसू पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी झाले होते. सर्व मृतक हे पाकिस्तानमधून विस्थापित झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लोक अचलावता गावात शेतीची कामे करीत असत, असंही म्हटलं जात आहे की, काही दिवसांपूर्वीच हे सर्व लोक पाकिस्तानातून जोधपूरला आले होते आणि ते गावातील शेतात काम करायचे आणि जवळच्या एका झोपडीत सर्वजण एकत्र राहत होते. 

तपासणी दरम्यान असं समोर आलं की, या कुटुंबात एकूण १२ जण होते त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील एक सदस्य रात्री दुसरीकडे झोपण्यासाठी निघून गेला होता. सकाळी जेव्हा तो आपल्या झोपडीकडे परतला तेव्हा त्याला कुटुंबातील अकराही जणांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. 

पोलिसांची एफएसएल टीमही घटनास्थळी पोहचली होती आणि त्यांनी घटनास्थळावरून काही पुरावे देखील गोळा केले आहेत. अद्याप या सर्वांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अकराही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्यामुळे मृतदेहांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकणार आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राहुल बरहाट यांनी अशी माहिती दिली की, ‘ही घटना रात्री घडली असावी. पण अद्याप आम्हाला मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु असे दिसते की, कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या सुमारास काही विषारी रसायन खाऊन आत्महत्या केली असण्याची दाट शक्यता आहे. ‘


ते पुढे असंही  म्हणाले की, ‘झोपडीच्या आजूबाजूला विषारी रसायनाचा वास येत होता. त्यामुळे या सगळ्यांचा मृत्यू एखादा विषारी रसायनामुळेच झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुटूंबातील हे सर्व सदस्य भिल्ल समाजातील पाकिस्तानचे हिंदू शरणार्थी होते आणि जोधपूर येथील खेड्यात शेतीसाठी येत शेतात राहत होते. या कुणाच्याही अंगावर अजिबात जखमा नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे मारहाण केल्याचे देखील आढळून आलेले नाही. परंतु तरीही आम्ही फॉरेन्सिक टीम आणि श्वान टीमला बोलावले आहे.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: