भाजपचे मंत्री जिवंत सैनिकाच्या घरी सांत्वनासाठी गेले, मदतीची घोषणा ऐकताच कुटुंबीय रडायला लागले

शहीद जवानाऐवजी केंद्रीय मंत्री श्रद्धांजली वाहण्यासाठी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले

जन आशिर्वाद यात्रेवर निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांची गुरुवारी जाम मोठी फजिती झाली. शहीद जवानाच्या घरी सांत्वनासाठी जाण्याऐवजी ते जिवंत असलेल्या आणि कामावर तैनात असलेल्या जवानाच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी जवानाच्या कुटुंबीयांपैकी एकाला नोकरी आणि सरकारी जमीन देण्याची घोषणाही केली. ही घोषणा ऐकल्यानंतर ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी रडायला सुरुवात केली.

फेसबुक वरून साभार

मंत्र्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते कर्नाटकातील गदग जिल्ह्यातल्या मुळगुंद इथल्या शहीद जवानाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. याऐवजी त्यांनी सेवेत असलेल्या रवीकुमार कट्टीमणी या जवानाच्या घराला भेट दिली. उशीर झाल्याने त्यांनी इकडची तिकडची फार चौकशी न करता घाईघाईत कट्टीमणी यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी लगेच मदतीची घोषणाही केली. ती ऐकल्यानंतर कट्टीमणी यांच्या घरच्यांना धक्काच बसला.

कट्टीमणी हे सध्या जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असून मंत्र्याने केलेली मदतीची घोषणा ऐतल्यानंतर कट्टीमणींचे आईवडील रडायला लागले. ही सगळी गडबड एका कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याने त्याने कट्टीमणी यांना त्यांच्या घरातूनच व्हिडीओ कॉल लावला. त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहून त्यांच्या घरच्यांना हायसं वाटलं. यावेळी ए नारायणस्वामी यांना आपली फजिती झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कट्टीमणी यांचं कौतुक करत त्यांच्या घरच्यांचा राग शांत करण्याचा आणि झालेली गडबड निस्तरण्याचा प्रयत्न केला. घरातून निघण्यापूर्वी त्यांनी घरच्या मंडळींचा सत्कारही केला.

कट्टीमणींच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ए नारायणस्वामी यांनी भाजप कार्यकर्त्यांना फैलावर घेतलं. चुकीच्या माहितीमुळे हा सगळा प्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार ए नारायणस्वामी हे पुण्यात कर्तव्यावर असताना मृत्यू ओढावलेल्या बसवराज हिरेमठ यांना श्रद्धांजली द्यायला जाणार होते, मात्र ते कट्टीमणी यांच्या घरी पोहोचले. टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: