शिक्षकांचा पगार परस्पर हडपला; संस्था सचिवा सोबत मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

बार्शी : आपल्या शिक्षणसंस्थेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांचा 38,82,518  रुपये थकित पगार त्यांच्या परस्पर आपल्या खात्यावर जमा करुन तो हडप केल्याप्रकरणी तालुक्यातील सर्जापूर येथील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव बाळासाहेब नरहरी कोरके व या संस्थेच्या जामगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांच्याविरोधात भा.दं.वि. 420 व अन्य कलमान्वये 4 गुन्हे दाखल करण्याचे आदेश माढा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.टी. गित्ते यांनी दिले आहेत. 


संस्थाचालकावर अपहार व फसवणुकीप्रकरणी एकाचवेळी 4 गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोरके याचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने या संस्थेच्या अनेक शाखावर काही महिन्यापुर्वीच शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी फिर्यादी शिक्षकांच्यावतीने ऍड. आर.यू. वैद्य यांनी काम पाहिले. 


समाजकल्याण विभागाच्यावतीने अनुदान मिळणार्‍या जामगाव माध्यमिक आश्रमशाळेत हनुमंत क्षीरसागर, हरी पोटभरे, शिवाजी घुगे, समाधान हजारे हे शिक्षक कार्यरत होते. या शिक्षकांचा जून 2010 ते एप्रिल 2013 दरम्यानचा पगार त्यांना मिळाला नव्हता. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर थकित पगार 38,82,518  रुपये आश्रमशाळेच्या बँक खात्यावर दि. 16 डिसेंबर 2013 रोजी जमा करण्यात आला होता. त्यापैकी पांडुरंग कानगुडे याने स्वत: 10 लाख रुपये काढून घेतले तर उर्वरीत रक्कम त्याने कोरके याच्या बँक खात्यावर भरले असल्याचे उघड झाले. हे करण्यासाठी त्यांनी वरील चौघांनी सोसायटीचे कर्ज काढल्याची व त्याच्या परतफेडीसाठी हे पैसे भरल्याची कागदपत्रे तयार केली होती. या शिक्षकांनी सोसायटीचे कर्ज काढलेले नसल्यामुळे त्या दोघांकडे आपल्या पगाराची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

त्यानंतर त्यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीच्या चौकशीत कोरके आणि कानगुडे यांनी पगार हडपल्याची कबुली दिली. मात्र आजतागायत या शिक्षकांना पगाराची रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम पोलिसांकडे तक्रार केली मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे माढा न्यायलयात फिर्याद दाखल केली. याबाबत झालेल्या युक्तीवादानंतर न्यायाधीशांनी वरील चारही प्रकरणात कोरके आणि कानगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: