सोलापूर: धक्कादायक बातमी ; कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी,दोन मुलांचा खून करून स्वतः केली आत्महत्या

सोलापूर: धक्कादायक बातमी ; कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी,दोन मुलांचा खून करून स्वतः केली आत्महत्या

सोलापूर – कर्जाला कंटाळून एका हॉटेल चालकाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे सोमवारी रात्री १०च्या सुमारास घडली. या हॉटेल चालकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर सात व चार वर्षीय मुलांना गळफास लावला आणि स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलांना आणि पत्नीला संपवले आहे, आता मीही आत्महत्या करत आहे, असे भावाला मोबाइलवरून सांगून या हॉटेलचालकाने आत्महत्या केली.भाऊ घरी पोहोचेपर्यंत हा प्रकार घडून गेला होता. अमोल अशोक जगताप (वय ३७), मयूरी अमोल जगताप (वय २७), आदित्य (वय ६) आणि आयुष (वय 4, सर्व रा. रजपूत यांच्या घरी भाड्याने, हांडे प्लॉट, जुना पुना नाका) यांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली. त्याचा तणाव अमोल यांच्या मनावर होता. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये ‘मला माफ करा’ मी मुलांना व पत्नीला संपवले आहे, असे लिहिले आहे.

दरम्यान, अमोल जगताप व त्यांचे भाऊ हे हॉटेल चालवत होते.सोमवारी रात्रीच्या सुमाराला अमोल यांनी सुरुवातीला बेडरूममध्ये पत्नीचा गळा आवळला. त्या निपचित पडल्यानंतर आदित्य आणि आयुष्य या दोन मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये गळफास दिला. यानंतर त्यांनी आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. मी मुलांना आणि पत्नीला संपवले आहे, मीही आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.

फोन केल्यानंतर अमोल यांनी हॉलमध्ये गळफास घेतला. भाऊ व अन्य नातेवाईक अमोल यांच्या घरी आले. आतून दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरवाजा उचकटून आत गेल्यानंतर हॉलमध्ये अमोल यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या खोलीत दोन मुले आणि बेडरूममध्ये पत्नी मयूरी होते. त्यांचा गळा आवळून तर मुलांना गळफास लावून खून केल्याचे समोर आले.

कर्जबाजारीपणामुळे खून आणि आत्महत्येची चिठ्ठीत नोंद
मी अमोल जगताप कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी आणि दोन्ही मुलांना जीवे मारून मी स्वत: आत्महत्या करीत आहे असा मजकुर असलेली चिठ्ठी अमोल जगताप यांच्या घरात मिळून आली असून त्याची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: