यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत वीर व उजनी धरणातून तब्बल 60 टीएमसी पाणी नद्यात सोडले


पार्थ आराध्ये
पंढरपूर- यंदाच्या पावसाळा हंगामात वीर व उजनी धरणातून जवळपास 60 टीएमसी पाण्याचा विसर्ग नीरा व भीमा नदीत झाला आहे. यासह पावसाच्या पाण्याने या दोन्ही नद्या गेले अनेक दिवस दुथडी भरून वाहत आहेत. वीरमधून या पावसाळ्यात 32.45 तर उजनीतून भीमेत 27.80 टीएमसी पाणी 26 सप्टेंबरपर्यंत सोडण्यात आले आहे.

यंदा भीमा खोऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस असला तरी टेलएन्डची धरणे ही आता भरली आहेत. उजनीसारखे महाकाय धरण 109 टक्के भरले आहे. यासह या प्रकल्पातून सतत पाण्याचा विसर्ग ही केला जात आहे. सुरूवातीला नीरा खोऱ्यातील सर्व प्रकल्प भरले होते व यातून पाणी सोडण्यास ऑगस्टमध्येच सुरूवात झाली होती. गुंजवणी, देवघर, भाटघर ही धरणे भरल्यातून यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नीरा साखळी प्रकल्पातील वीर सतत ओव्हरफ्लो होत असल्याने यातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही.

आज शनिवारी 26 सप्टेंबर रोजी देखील वीरमधून 5 हजार 437 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीत होत आहे. दरम्यान या पावसाळा हंगामात आतापर्यंत 32.456 टीएमसी पाणी नीरा नदीत सोडले गेले आहे. या खोऱ्यातील धरणांची पाणीसाठवण क्षमता 48.329 टीएमसी असून ते प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत.

वीरमधून सोडलेले पाणी नृसिंहपूर संगम येथे भीमा नदीत मिसळते. येथेच भीमा व नीरा नदीचा संगम होतो. यामुळे वीरमधून सोडलेल्या पाण्याने भीमा मागील महिन्यापासून दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे उजनी प्रकल्प हा क्षमतेने भरल्याने यातून ही सतत पाणी सोडले जात आहे. उजनीतून या पावसाळ्यात 27.80 टीएमसी पाण्याचा विसर्ग आजवर भीमा नदीत झाला आहे. उजनीची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीची असून उपयुक्त साठा हा 58.45 टीएमसी इतका आहे. यामुळे जवळपास उपयुक्त साठ्याच्या पन्नास टक्के पाणी भीमा नदीत आत्तापर्यंत सोडण्यात आले आहे.

वीर व उजनीच्या पाण्याने मागील महिन्यापासून भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहत आहे. यामहिन्यात तर पडलेल्या अतिपावसाने ओढ्या नाल्यांच्या पाण्याने तर भीमा नदीची पातळी खूपच वाढली होती. मात्र आता नदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 17 हजार क्युसेकने वाहत आहे.

उजनी धरणावर यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून जूनपासून 738 मिलीमीटर पाऊस येथे नोंदला गेला आहे. शनिवारी देखील सात मि.मी. पावसाची नोंद या भीमानगर येथे आहे. सध्या उजनीत दौंडजवळून 5258 क्युसेक मिसळत आहेत. तर धरणातून भीमा नदीत 10 हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहेत. यासह वीज निर्मितीसाठी 1600 तसेच सीना माढा, आष्टी, करकंबा, शिरापूर, शिराळा, बोगदा, मुख्य कालव्यात पाणी सोडणे सुरूच आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: