सहा तासांच्या सर्व्हर डाऊनमुळे फेसबुकला कोट्यवधींचा फटका; झुकेरबर्ग ने वापरकर्त्यांची मागितली माफी

सहा तासांच्या सर्व्हर डाऊनमुळे फेसबुकला कोट्यवधींचा फटका; झुकेरबर्ग ने मागितली माफी

फेसबुकला आलेल्या 6 तांसाच्या व्यत्ययामुळे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती एका दिवसात 7 बिलियन्स डॉलर म्हणजेच 52,190 कोटी रुपयांनी घटली आहे.

नवी दिल्ली – व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे. मात्र, या 6 तांसाच्या बंदमुळे फेसबुकचं मोठं नुकसान झालं आहे.

फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे, आर्थिक गणित पाहिल्यास मोठा फटका कंपनीला बसला आहे. फेसबुकने एक पत्र जारी करुन गेल्या 6 तासांतील सर्व्हर डाऊनचा कंपनीला किती फटका बसला हे सांगितलं. फेसबुकला आलेला व्यत्यय हा युजर्संसाठीची मोठी जोखीम होती, तर आर्थिक नुकसानीचा विचार केल्यास मध्यम जोखीम असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. कंपनीच्या प्रतिष्ठेचा विचार केल्यास हा व्यत्यय खूप मोठा नुकसानकारक असल्याचंही कंपनीने पत्रातून सांगितलं आहे.

फेसबुकला आलेल्या 6 तांसाच्या व्यत्ययामुळे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती एका दिवसात 7 बिलियन्स डॉलर म्हणजेच 52,190 कोटी रुपयांनी घटली आहे. तर, फेसबुकला आलेल्या या डाऊन क्रॅशमुळे कंपनीच्या रेव्यन्यूमध्ये 80 मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळपास 596 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि व्हॉट्सअप बंद पडल्याने इंटरनेट ग्लोबल ऑब्जर्वेटरीच्या अंदाजानुसार जगभरातील अर्थव्यवस्थेला प्रति तासाला 160 मिलियन्स डॉलर म्हणजेच 1192.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

 मार्क झुकरबर्गने मागितली माफी

तुमची काळजी करणाऱ्या तुमच्या लोकांसोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे किती जोडले आहात, हे मला माहिती आहे. या सेवांमुळे ती बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच, आमच्याकडून झालेल्या व्यत्ययाबद्दल मी आपणा सर्वाची माफी मागतो, अशी फेसबुक पोस्ट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली आहे.

सोमवारी रात्री अचानक फेसबुक आणि व्हॉट्सएप डाऊन झाल्याने अनेकांनी आपले इंटरनेट कनेक्शन चेक करायला सुरुवात केली. काहींना वाटले हा केवळ आपल्या एकट्यापुरताच विषय आहे. मात्र, थोड्यात वेळात एकमेकांमध्ये याची चर्चा सुरू झाली, तर ट्विटरही हीच चर्चा रंगली. त्यानंतर, काही वेळांतच माध्यमांमध्ये ही बातमी आल्याने हे सर्व्हर डाऊन झाल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. त्यामुळे, भारतात अनेकांनी गुड नाईट करुन गादीवर आपलं अंग टाकून निद्रावस्था धारण केली.

नेमकं काय झालं ?

भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.

ट्विटरवरील व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत हॅण्डलवरुन वापरकर्त्यांची माफी मागण्यात आलीय. आज अनेकांना आमची सेवा वापरण्यात अडचणी त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा हळूहळू आणि काळजीपूर्वक पद्धतीने सुरु करण्याचं काम आम्ही करत आहोत. तुम्ही दाखवलेल्या धैर्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. यासंदर्भात आम्हाला अधिक माहिती मिळाल्यास आम्ही ती तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू, असं कंपनीने म्हटलं आहे.

तर मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: