शिवसेनेच्या नेत्या स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणाच गूढ उकललं, पतीसह दोघांना अटक

 

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या आणि माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत खून केल्याप्रकरणी त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत ऊर्फ भाई गजानन सावंत यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा खून केल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामुळे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता होत्या. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

त्यांच्या पतीनेच खून केल्याचे निष्पन्न झाले. सुकांत सावंत यांची स्वप्नाली ही दुसरी पत्नी होती. या दोघांमध्ये गेले अनेक महिने कौटुंबिक वाद सुरू होता. काहीवेळा त्यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचला होता.याला कंटाळूनच स्वप्नाली सावंत या मुलीसह भाट्ये येथे भाड्याने राहत होत्या. 30 ऑगस्टला गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे मिऱ्या येथील निवासस्थानी त्या आल्या होत्या. मात्र , स्वप्नाली मिऱ्याबंदर येथील घरातून निघून गेली आणि परत आली नाही अशी तक्रार तिचे पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात दिली

मात्र पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तिच्या घातपाताच्या संशयावरून तपास सुरू केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली यांची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संगीता शिर्के आणि तिच्या अन्य मुली मिऱ्या येथील स्वप्नाली सावंत यांच्या घरी गेल्या. तेथे सुकांत सावंत होता त्याच्याशी झालेल्या वादात सुकांतने स्वप्नालीला ठार मारल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुकांत सावंत यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Team Global News Marathi: