‘आज तक’चे ज्येष्ठ पत्रकार आणि अँकर रोहित सरदाना यांचं निधन

 

नवी दिल्ली: ज्येष्ठ पत्रकार आणि आज तक चँनेलचे प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं आज (30 एप्रिल) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दिल्लीतील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दु:खद निधन झालं. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

रोहित सरदाना यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण त्यातून ते बरे होऊन आपल्या कामालाही लागले होते. गुरवारी रात्रीपर्यंत ते आज तक वाहिनीतील आपलं दैनंदिन काम करत होते. तसंच कोरोनाच्या काळात आपल्या इतर सहकाऱ्यांनाही दिलासा देऊन कामाचं नियोजन करत होते. गुरुवारी रात्री त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नोएडा परिसरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथेच शुक्रवारी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झालं.

रोहित यांचा जन्म हरियाणातील कुरूक्षेत्रमध्ये झाला होता. त्यांना बेस्ट अँकरसाठी एनटी अवॉर्ड आणि एनबीए अवॉर्डने गौरविण्यात आलं होतं. तसंच हिंदी पत्रकारितेतील मानाचा समजला जाणारा गणेश विद्यार्थी पुरस्काराचेही ते मानकरी होते.

 

रोहित सरदाना हे हिंदी टीव्ही न्यूज विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात ऑल इंडिया रेडियोवर उद्घोषक म्हणून केली होती. त्यानंतर ईटीव्ही, सहारा समय, झी न्यूज आणि सर्वात शेवटी आज तकवर त्यांचं अँकरिंग विशेष अर्थाने आणि आवडीने पाहिलं जायचं. हिंदी टीव्ही पत्रकारितेत रोहित सरदाना यांचं नाव अग्रक्रमाने ओळखलं जायचं. आज तक वाहिनीवर प्राईम टाईममध्ये येणारा त्यांचा दंगल हा चर्चात्मक शो टीव्ही विश्वात अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो होता.

शो करताना समोरच्याला अत्यंत सडेतोड प्रश्न विचारण्याची त्यांची विशेष हातोटी होती. सत्तेतील असो किंवा विरोधी पक्षातील राजकारणी त्यांना योग्य ते प्रश्न विचारून भंडावून सोडण्याची त्यांची पत्रकारिता जनमानसात अत्यंत लोकप्रिय होती. सोशल मीडियावरही त्यांचे लाखो फॉलोवर्स होते.

रोहित सरदाना यांच्या पत्रकारितेतील करियरमध्ये त्यांच्या काही बातम्या विशेष गाजल्या आणि ज्याने देशातील राजकारणही बरेचदा ढवळून निघालं. जेएनयूमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणा, काश्मीरमधील हुरियत नेत्यांचं पाकिस्तानी फंड कनेक्शन, पश्चिम बंगालमधील मालदा आणि धूलागढमधील जातीय हिंसाचार, तीन तलाक विरोधातील सामाजिक आंदोलनाची सुरवात या त्यांच्या बातम्या विशेष गाजल्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारांच्या कामाचा लेखाजोखा यावर आधारित त्यांचा ‘मील का पत्थर’ हा कार्यक्रम त्याकाळात प्रचंड गाजला होता. एक उत्तम अँकर असण्याबरोबरच ते तितकेच निर्भिड रिपोर्टरही होते.

ग्राऊंड झीरोवर जाऊन सामान्य जनतेचे प्रश्न अतिशय तडफेने ते सरकारसमोर मांडायचे. त्यांच्या निधनाने अनेक मान्यवर व्यक्ती, राजकारणी आणि समाजातील अनेक स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. रोहित सरदाना यांना मुंबई तककडून भावपूर्ण श्रध्दांजली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: