हिजाब विरुद्ध भगवी शाल वाद; कर्नाटकातील शाळा-कॉलेज तीन दिवस बंद

कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवी शाल वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. हा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. वाद वाढण्याची चिन्हे दिसताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यात लक्ष घातले आहे. कर्नाटकातील सध्याची परिस्थिती बघता त्यांनी पुढील तीन दिवस शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या मुद्द्यावर जनतेने शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत शांतता आणि सोहार्दाचे वातावरण राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शाळा-कॉलेज व्यवस्थापन आणि कर्नाटकातील जनतेने संयम बाळगावा, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती बघता पुढील तीन दिवस शाळा-कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

 

शिमोगा येथील एका सरकारी शाळेत तिरंगा फडकवण्याच्या पोलवर भगवा झेंडा फडवल्याची घटना घडल्यानंतर बोम्मई यांनी ट्विट करत हो आवाहन केले आहे. काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी शिमोगा येथील या घटनेचा निषेध केला आहे.

 

हिजाबबाबतच्या प्रकरणाची कर्नाटक उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले. हा वाद चिघळण्याची चिन्हे असल्याने कर्नाटकातील शाळा-कॉलेज तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: