आधी बलात्कार केला, तक्रार दिल्यानंतर तरुणीला कोयत्याने मारहाण; बार्शी तालुक्यातील घटना

आधी बलात्कार केला, तक्रार दिल्यानंतर तरुणीला कोयत्याने मारहाण; बार्शी तालुक्यातील घटना

बार्शी – तालुक्यातील बळेवाडी येथे धक्कादायक घटना घडली असून १२ वीची परीक्षा देत असलेल्या मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार करण्यात आले आहेत. याबाबत, मुलीच्या वडिलांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विनायक माने, नामदेव सिद्धेश्वर दळवी, राहणार दोघेही बळेवाडी अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग धरुन तिच्यावर हल्ला करण्यात आला.

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, बळेवाडी येथे गावातच त्यांचे किराणा दुकान असून पत्नीचा ब्यूटी पार्लरचा व्यवसाय आहे. त्यावर आमचे कुटूंबाची उपजिवीका चालते. सध्या, मुलगी निर्भया (बदललेलं नाव) ही इयत्ता 12 वी
ची परीक्षा देत आहे. दरम्यान, 05 मार्च रोजी रात्री 09/30 वाजताच्या सुमारास गावातील इसम अक्षय विनायक माने आणि नामदेव सिध्देश्वर दळवी यांनी तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केला. त्याबाबत रात्री बार्शी शहर पोलीस ठाणे येथे येवुन मुलगी निर्भया हिने तक्रार दिल्याने सदर बाबत बार्शी शहर पोलीस ठाणेस पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम 376,354, 341, 323, 504, 506,34 व. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याचा राग मनात धरुन सोमवार 06 मार्च सांयकाळी 08/00 च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मुलीने निर्भयावर दोन तरुणांनी सत्तूर व कोयत्याने मारहाण केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यामध्ये, मुलीचे उजव्या हाताचे 2 बोटे तुटले आहे. जखमी अवस्थेत मुलीला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेचे गांभीर्य ओळखुन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सारदेशपांडे यांनी रात्रीच बार्शीत भेट दिली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पथके रवाना केली आहेत

दरम्यान, याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या तक्रारीवरुन अक्षय दिनायक माने आणि नामदेव सिध्देश्वर दळवी यांच्याविरुद्ध पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: