प्रश्न मराठा आरक्षणाचा:जिल्हा कमिटीच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्धार

मराठा आरक्षणप्रश्नी बार्शीत सकल मराठा समाजाची बैठक

जिल्हा कमिटीच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्धार

बार्शी :

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा समाजबांधवांच्या भावना तीव्र होताना दिसत असून सकल मराठा समाजाच्या जिल्हा कमिटीच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी याअनुषंगाने पुकारलेला बंद बार्शी शहर व तालुक्यात यशस्वी करण्याचा तसेच समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध पातळयांवर सनदशीर मार्गाने लढा देत आरक्षण मिळविण्याचा निर्धार करण्यात आला.

येथील जवाहर हॉस्पीटलच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळयाजवळ झालेल्या या बैठकीप्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण गाढवे, नारायण जगदाळे यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

सन २०१८ च्या नोकरी आणि शिक्षणातील मराठा आरक्षण कायद्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दि ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. त्यानंतर मराठा समाजबांधवांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळे राज्यभरात पुन्हा सकल मराठा समाज या प्रश्नासाठी एकत्र येत आहे. याचाच भाग म्हणून सकल मराठा समाजाच्या जिल्हा कमिटीच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी बंदची हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर बार्शीत सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. समाज बांधवांनी पुन्हा राजकारण विरहीत एकीची वज्रमूठ दाखवावी. कायदेशीर अडचणींची सोडवणूक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला बाध्य करावे. त्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी. न्यायालयीन पातळीवर सक्षमपणे बाजू मांडण्यात यावी.

फक्त आरक्षणापुरतेच एकत्र न येता समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुध्दा या व्यासपीठावरून प्रयत्न व्हायला हवेत. जरी अनेकजण विविध राजकीय पक्षात असले तरी त्यांनी समाजाच्या कामाकरीता राजकीय जोडे बाहेर सोडून यात सामील व्हावे असे विचार मांडण्यात आले. कायदेशीर मार्गाने व सनदशीर आंदोलने उभारून हा लढा आपण जिंकू असा विश्वास व्यक्त करत आरक्षण मागणीवरून समाजातील युवकांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बार्शी शहरासह ग्रामीण भागातही हा बंद यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी प्रयत्न करावेत अशी हाक यावेळी देण्यात आली. शनिवार दि. १९ रोजी पुन्हा आढावा बैठक होईल असे यावेळी सांगण्यात आले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: