पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत केली दिवाळी साजरी

 

नवी दिल्ली | यंदा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या बहादुरीचे कौतुक करत सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. या वर्षी ते काश्मीरमधील नौशेरा येथे गेले होते. ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राइक सुरू असताना तिथे भारतीय जवानांच्या कशा हालचाली सुरू आहेत याची माहिती मी घेत होतो. याआधी संरक्षण सामग्रीबाबत भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागे. पण, सरकारने स्वदेशातच संरक्षण साधनांचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिल्याने लष्करी सामर्थ्यात खूप फरक पडला.

तसेच पंतप्रधान मोदी यांनी जवानांना मिठाईचे वाटप केले. ते म्हणाले की, भारतानेही नवीन युद्धतंत्रे आत्मसात करायला हवीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी लवकरच दिल्लीहून काश्मीरला जाण्यासाठी विमानतळाच्या दिशेने निघाले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात नेहमीपेक्षा कमी वाहने व सुरक्षा जवान होते. वाटेतील सिग्नलवरही ताफ्यातील वाहने थांबत होती. पंतप्रधान ज्या रस्त्याने गेले, तिथे नेहमीप्रमाणे कडक बंदोबस्तही नव्हता.

यावेळी जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, जवानांनी २०१६ साली सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. तो ऐतिहासिक दिवस मी मनावर कोरून ठेवला आहे. या हल्ल्यामध्ये नौशेरा क्षेत्रातील लष्कराच्या ब्रिगेडने जी कामगिरी बजावली ती अभिमानास्पद होती, अशा शब्दांत त्यांनी जवानांच्या बहादुरीचे कौतुक केले.

Team Global News Marathi: