“पहिल्या टप्प्यातच लोकांनी भाजपला झोपवले”, अखिलेश यादव यांचा दावा

 

उत्तरप्रदेश | पश्‍चिमी उत्तरप्रदेशात झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच तेथील लोकांनी भारतीय जनता पक्षाला झोपवले आहे. आता उर्वरित राज्यातही भारतीय जनता पक्षाचा सफाया होणार आहे असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रामपूर येथील प्रचार सभेत बोलताना केले.

ते म्हणाले की, खोटे बोलण्याखेरीज भाजपचे लोक काहींच करू शकत नाहीत. त्यांचा नेता जितका मोठा तितका तो अधिक मोठे खोटे बोलतो असे ते म्हणाले. रामपूर मतदार संघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान हे निवडणूक लढवत असले तरी सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांना म्हैस चोरीच्या खोट्या आरोपासारख्या कारणावरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. ज्या मंत्रिपूत्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांची हत्या केली त्या मंत्रिपूत्राला जामीनावर सोडले गेले आहे आणि आझमखान यांच्या सारख्या आमच्या नेत्याला मात्र क्षुल्लक व खोटे मुद्दे उपस्थित करून तरूंगात डांबले गेले आहे.

भाजपच्या या मनमानीला येथील जनताच आता उत्तर देईल असे ते म्हणाले. आझम खान यांच्यावर बकरी चोरी, म्हैस चोरी, पुस्तक चोरी यासारखे हास्यास्पद खटले दाखल आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या विरोधातील सारे खोटे खटले काढून टाकले जातील असेही त्यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: