नांदेडच्या चौदा वर्षाच्या रेवाने अमेरिकेत उडविले विमान, होत आहे सर्वत्र कौतुक |

 

नांदेडच्या कोंढा गावच्या कन्येने आकाशात भरारी घेतली आहे. अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत अगदी लहान वयात विमान उडवण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या कामगिरीने संपूर्ण गावकऱ्यांना तिचा अभिमान वाटत आहे.

कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी रेवा दिलीप जोगदंड यांच्या मनावर झाला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि वयाच्या १४ व्या वर्षी तीचं हे स्वप्न सत्यात उतरले.

रेवाच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात.

Team Global News Marathi: