आग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

ग्लोबल न्यूज: सुमारे 140 कोटी रुपये खर्चून आग्रा येथे बांधण्यात येत असलेल्या मुघल वस्तू संग्रहालयाचे नाव बदलून त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यामुळे ते अनेकवेळा ट्रोल झाले आणि नामांतराविषयी थट्टेचा विषयही झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक नामांतर केले असून यावेळी त्यांनी आग्रा येथील बांधकाम सुरू असलेल्या वस्तू संग्रहालयाचे नामांतर जाहीर केले आहे.

या संदर्भात ट्विटरवर पोस्ट करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की, “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल”.

ताजमहाल या वास्तूच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येतं आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ऐतिहासिक असून आग्रा किल्ल्यासमोरच त्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा 30 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेला आहे. आता महाराजांच्या नावे वस्तू संग्रहालय उभा राहत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: